धुळे जिल्हा रुग्णालयातील अस्वच्छता, कचऱ्याचे ढीग आणि नाल्यांच्या दूषित पाण्याच्या समस्येवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. रुग्णालयाच्या बाह्य आवाराची स्वच्छता, रुग्णांना बसण्यासाठी बाकडे, पार्किंगची योग्य व्यवस्था तात्काळ न केल्यास आगामी उद्घाटन सोहळ्यात आरोग्यमंत्र्यांना प्रवेश करू देणार नाही, असा इशारा ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
गेल्या महिन्याभरापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता आर. आर. पाटील यांना रुग्णालयातील ड्रेनेज आणि पाण्याच्या समस्येबाबत कार्यवाही करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, अद्यापही कोणतीही ठोस उपाययोजना न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. सध्या रुग्णालयाच्या अपघात विभागाशेजारील नाल्यातील दूषित पाणी परिसरात साचत असून, झुडपे व कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे रुग्णांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री यांच्याहस्ते रुग्णालयाचे उद्घाटन अवघ्या चार दिवसांवर आले असताना जिल्हा रुग्णालयाच्या बाह्य आवारात अस्वच्छतेचे साम्राज्य असल्याने रुग्ण व नातेवाईकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ही परिस्थिती तातडीने सुधारली नाही तर उद्घाटन सोहळा रोखण्याचा इशारा ठाकरे सेनेने दिल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.
