दोंडाईचा : स्थानिक पोलीस ठाण्यात आयोजित पोलीस दरबारात बंदोबस्ताचा आढावा घेऊन कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली हा दरबार पार पडला.
गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हा बंदोबस्त यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच, पोलीस ठाण्याचे कामकाज अधिक गतिमान व सुटसुटीत करण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या.
दरम्यान, आगामी नवरात्रोत्सव, दिवाळी तसेच निवडणुका लक्षात घेऊन काय उपाययोजना कराव्यात यावरही चर्चा झाली. कर्मचाऱ्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेऊन त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन पोलीस निरीक्षक सोनवणे यांनी दिले.
या बैठकीस सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, दिंगबर शिंपी, नकुल कुमावत, अविनाश दहिफळे, राजन दुसाने,हेड कॉन्स्टेबल अविनाश पाटील आणि पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

