नंदुरबार चाकूहल्ल्यात जखमी तरुणाचा मृत्यू; शहरात कडक बंद

नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनी परिसरात मंगळवार १६ सप्टेंबर रोजी झालेल्या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान बुधवारी रात्री सुरत येथे मृत्यू झाला. या घटनेने नंदुरबार शहरात तणावाचे वातावरण निर्माण केले. खबरदारी म्हणून गुरुवारी शहरातील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेवली आणि शहरात दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा व महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आली होती. मंगळ बाजार, सुभाष चौक, अंधारे चौक आणि पालिका रोडसारख्या नेहमी गजबजलेल्या भागातही शुकशुकाट पसरले. शहरातील बंद शांततेत पार पडला. पोलिसांनी शहरातील संवेदनशील भागांमध्ये बॅरिकेडिंग केली असून, विविध ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवला होता, जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये.

या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याला न्यायालयात हजर केल्यावर चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. याचप्रमाणे, एका पोलिस कर्मचाऱ्याचाही प्रकरणात सहभाग असल्याचे समोर आले असून त्यालाही ताब्यात घेऊन निलंबित करण्यात आले आहे. पोलिस प्रशासनाने या घटनेची सखोल चौकशी सुरू केली असून, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

प्रतिनिधी- कार्तिक सोनवणे,
धुळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top