धुळे (ता. ३०): धुळे महानगरपालिकेच्या जुन्या प्रभाग क्र. ६ मधील नकाणे गावातील आदिवासी वस्तीत तब्बल २० लाख रुपयांचा निधी खर्च करून बांधण्यात आलेले दहा सीटचे सुलभ शौचालयच चोरीला गेले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दोन वर्षांपूर्वी बांधलेले हे शौचालय प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही, अशी गंभीर बाब समोर आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
सन २०२१-२२ मध्ये महिला बालकल्याण निधी अंतर्गत या शौचालयासाठी १९,९८,८७८ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. ठेकेदार ‘मे. आदर्श कन्स्ट्रक्शन’ यांनी ९ फेब्रुवारी २०२३ रोजी काम पूर्ण झाल्याचे दाखवत महानगरपालिकेकडून संपूर्ण बिल देखील वसूल केले. परंतु, प्रत्यक्ष ठिकाणी नागरिकांना शौचालयाचा मागमूसही नाही.
हा प्रकार उघड करण्याचे श्रेय शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षाला जाते. पक्षाचे विधी व न्याय विभाग प्रमुख अॅड. भूषण उर्फ बंटी पाटील यांनी माहिती अधिकारातून तपशील मिळवून चौकशी केल्यानंतर घोटाळा उघड केला. आज जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी, महानगर प्रमुख धीरज पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने वस्तीत भेट देऊन नागरिकांकडून माहिती घेतली.
स्थानिक रहिवासी मगन मातंग यांनी स्पष्ट केले की, “गेल्या दोन वर्षांत या भागात कोणतेही सार्वजनिक शौचालय बांधलेले नाही. आजही महिलांना उघड्यावर शौचास जावे लागते.” त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.
या प्रकरणात महापालिका आयुक्त, संबंधित अभियंते व प्रभागाचे माजी नगरसेवक यांच्यावर संगनमताने भ्रष्टाचाराचा आरोप होत असून, लवकरच देवपूर पश्चिम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली जाणार असल्याचे अॅड. बंटी पाटील यांनी सांगितले. शिवसेनेने या घोटाळ्यावर तीव्र प्रतिक्रिया देत जबाबदारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
– प्रतिनिधी कार्तिक सोनवणे

