निजामपूर-साक्री तालुक्यातील जैताणे येथील लामकनी रोडलगत असलेल्या वडिलोपार्जित कुंभार खान या परिचित जागेवर अज्ञात इसमांनी बेकायदेशीर अतिक्रमण केल्याची घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 200 वर्षांपासून परंपरेने चालत आलेली ही जागा कुंभार खान म्हणून ओळखली जाते. या ठिकाणावरून गावातील कुंभार समाज माती घेऊन कलाकुसरीची भांडी बनवून उदरनिर्वाह करतो.
मात्र अलीकडेच अज्ञात लोकांनी या जागेवर मुरूम टपर्या उभ्या करून अतिक्रमण केले आहे. या प्रकारामुळे गावातील कुंभार समाजात तीव्र संतापाची लाट उसळली असून, हे अतिक्रमण तात्काळ हटवावे, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
याबाबत समस्त कुंभार समाजाने जैताणे ग्रामपंचायत सरपंच आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक यांना निवेदनाच्या प्रती सादर करून कारवाईची मागणी केली आहे.
-प्रतिनिधी हेमंत महाले

