साक्री : नवरात्रीच्या पावन वातावरणात प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, साक्री येथे मंगळवार, दि. १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी मातृशक्तीचा अनोखा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात ब्रह्माकुमारी विद्यालयाच्या नियमित विद्यार्थिनी असलेल्या माता देवींच्या स्वरूपात सजवून त्यांचा सन्मान करण्यात आला. सेंटरच्या दीदींनी प्रत्येकीला टोप, हार व ओढणी परिधान करून देवीस्वरूपात अलंकृत केले. त्यानंतर प्रत्येक मातेला देवीचा स्वमान देऊन त्यांच्या हस्ते उपस्थितांना वरदान देण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान साक्री ब्रह्माकुमारी सेंटरच्या संचालिका राजयोगिनी शीला दीदींनी भूषवले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात प्रत्येक स्त्री ही आपल्या घरात देवी समान भूमिका निभावते, असे सांगत देवींच्या विविध रूपांचा महिमा स्पष्ट केला. वैष्णवी देवी विषय-विकारांवर विजय प्राप्त करण्याचे प्रतीक तर उमा देवी उमंग-उत्साह वाढवण्याचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी वातावरण भक्तिमय आणि अलौकिक झाले होते. कार्यक्रमाचा समारोप देवींच्या आरतीने झाला व सर्वांनी गरबा-नृत्यात सहभागी होत आनंद लुटला.
या कार्यक्रमासाठी शीला दीदींसोबत सुनंदा दीदी, गीता दीदी, प्रतिभा दीदी, पल्लवी दीदी, सीमा दीदी व सुनीता दीदी यांनी सहयोग केला.
प्रतिनिधी – निलेश सावळे

