धुळे : शेतकरी नैसर्गिक संकटांना तोंड देत असतानाच त्यांचे जीवन हलाखीचे बनले आहे. मात्र शेतकऱ्यांनी शास्त्रोक्त शेतीचा अवलंब केल्यास भरघोस उत्पन्न मिळते, असे प्रतिपादन माजी आमदार कुणाल पाटील यांनी केले.
विंचूर येथे पार्श्व जेनेटिक्स इनोव्हेज सिडसतर्फे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी अंदाज वर्तवला की, यंदाचा पावसाळा दि. १५ ऑक्टोबरपासून माघारी फिरणार असून मधल्या काळात तुरळक पाऊस होण्याची शक्यता आहे. निसर्गचक्र साधारण २२ दिवस पुढे सरकले असल्याने शेतकऱ्यांनी त्यानुसारच पिकपेरणीचे नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले.
मेळाव्यापूर्वी मका पिकाची पाहणी करण्यात आली. या वेळी इनोव्हेज सिडसचे कार्यकारी संचालक अंकीत बरबेटा, बाजार समितीचे सभापती साहेबराव खैरनार आदी मान्यवर उपस्थित होते.
कुणाल पाटील यांचे प्रतिपादन :
“हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरत आहे. शास्त्रोक्त पद्धतीने पिक लागवड केली, योग्य खतांचा वापर व नियोजन केले, तर शेतकरी अधिक उत्पादन घेऊ शकतो.”
पंजाबराव डख यांचे मार्गदर्शन :
“शेतकऱ्यांनी हवामानाला घाबरू नये. मी शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही. शेतीसाठी चांगले दिवस पुढे येतील. बियाणे उत्पादक कंपन्यांनी शेतकऱ्यांना उत्तम प्रतीचे वाण पुरवणे गरजेचे आहे.”
कार्यक्रमाला भानुदास माळी, गोरख खैरनार, डॉ. संदीप पाटील, हरी राजपूत, सुभाष बोरसे, जनार्दन देसले, भाऊसाहेब देसले, वसंतराव पगारे, बाबाजी पाटील, खेमचंद खैरनार यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

