अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान,खासदार डॉ. शोभा बच्छाव यांचा धुळे तालुक्यात दौरा

धुळे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. उत्तर महाराष्ट्रात विशेषतः धुळे जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तात्काळ प्रति हेक्टर ५० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

राज्य शासनाने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत असून नुकसानीची पाहणी करण्यासाठी पक्षाच्या वतीने समित्या गठित करण्यात आल्या आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांची पाहणी समिती प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी धुळे तालुक्यातील नाणे, सिताणे, नंदाळे, बोरकुंड व शिरूड शिवारातील शेतजमिनींची पाहणी केली. या दौऱ्यात उपविभागीय अधिकारी रोहन कुवर उपस्थित होते. पाहणीदरम्यान पंचनामे पूर्ण झाले आहेत का, याचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

पाहणी अहवाल काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाकडे सादर करण्यात येणार असून त्यानंतर राज्यपालांची भेट घेऊन शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट भरपाई देण्याची मागणी करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top