धुळे : धुळे तालुक्यातील गरताड परिसरातील शेतकऱ्यांनी शेतातील पिकांचे नुकसान करणाऱ्या पाळीव डुक्करांचा बंदोबस्त करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
चाळीसगाव रोडवरील महामार्गालगत असलेल्या शेतकरी सुधाकर पांडुरंग पाटील यांच्या मालकीच्या शेतात गेल्या पाच ते सहा वर्षांपासून डुकरांनी थैमान घातले आहे. या डुकरांमुळे बाजरी, मका, भुईमूग आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
वारंवार सूचना करूनही पाळीव प्राण्यांच्या मालकांनी या समस्येकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. प्रशासनाकडे तक्रार दाखल करूनही कोणतीही कारवाई झालेली नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
सध्या पावसामुळे आधीच पिकांचे नुकसान होत असताना डुकरांमुळे होणारे अतिरिक्त नुकसान शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालत आहे. “तोंडाशी आलेला घास डुकरांनी हिरावून घेतला असून शेतकरी जगावा का मरावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे,” अशी भावना शेतकरी सुधाकर पांडुरंग पाटील यांनी व्यक्त केली.
प्रशासनाने तात्काळ गंभीर पावले उचलून डुकरांचे मालकांवर कारवाई करावी आणि डुकरांना गावाबाहेर काढावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अन्यथा उग्र आंदोलनाचा इशारा सुधाकर पाटील यांनी दिला आहे.

