२३ वर्षांनंतर पुन्हा सुरू होणार पांझरा कान साखर कारखाना; ९ ऑक्टोबरला भव्य शेतकरी मेळावा

साक्री (जि. धुळे) – साक्री तालुक्यातील गेल्या २३ वर्षांपासून बंद असलेल्या पांझरा कान सहकारी साखर कारखान्याच्या पुनरुज्जीवनाला अखेर गती मिळणार आहे. येत्या गुरुवार, दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ रोजी कारखाना साईटवर भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमात कारखान्याचे स्पायका ग्रीन ऍग्रो अँड डिस्टलरी पॉवर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे औपचारिक हस्तांतरण होणार आहे.

या ऐतिहासिक निर्णयामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठा उत्साह असून, बंद पडलेल्या साखर कारखान्याच्या चाकांना पुन्हा एकदा गती मिळणार असल्याने शेतकरी, कामगार आणि व्यावसायिक वर्गात नवचैतन्य निर्माण झाले आहे.

या प्रकल्पामुळे परिसरातील शेकडो कुशल कामगारांना रोजगार उपलब्ध होईल, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या परिसरातच योग्य भाव मिळेल आणि स्थानिक विकासालाही गती मिळेल, असा विश्वास शेतकरी व्यक्त करत आहेत.

या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे, धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल, साक्री तालुक्याच्या आमदार सौ. मंजुळाताई गावित, तसेच पांझरा कान बचाव समितीचे अध्यक्ष व जिल्हा शिवसेना अध्यक्ष डॉ. तुळशीराम गावित आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते स्पायका ग्रीन ऍग्रो अँड डिस्टलरी पॉवर प्रा. लि. चे चेअरमन उद्योजक बबनराव गायकवाड यांना कारखान्याचे हस्तांतरणपत्र सुपूर्द करण्यात येणार आहे.

या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन भाडणे गावचे सरपंच अजय सोनवणे यांनी केले आहे.

-प्रतिनिधी निलेश सावळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top