साक्रीत गुरु-शिष्य नात्याला उजाळा – 2002 च्या बॅचचा भावनिक गुरुशिष्य मेळावा

साक्री तालुक्यातील कासारे येथील वसंतराव दादा पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील 2002 च्या एस.एस.सी. बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी दीपावलीच्या शुभ पर्वावर विद्यालयात भावनिक गुरु-शिष्य मेळावा आयोजित केला. तब्बल तेवीस वर्षांनंतर एकत्र आलेल्या या विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करत जुने दिवस उजाळले.

या मेळाव्यात अध्यक्षस्थानी विद्यालयाचे माजी प्रथम प्राचार्य बी.एम. भामरे हे होते. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “आजच्या धुसर होत चाललेल्या गुरु-शिष्य नात्याच्या काळात माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेला ऋणनिर्देश आणि त्यांच्या संस्कारांची स्मृती भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.”

मेळाव्याला विद्यमान प्राचार्य डी.एन. पाटील, माजी गुरुजन ए.डी. खैरनार, वाय.एल. जाधव, अविनाश मराठे, तसेच तालुका गणित विज्ञान अध्यापक मंडळाचे तालुकाध्यक्ष के.एस. बच्छाव उपस्थित होते.

माजी विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की — “या विद्यालयातील गुरुजनांनी आम्हाला दिलेले संस्कारच आज आमच्या आयुष्याचा पाया आहेत. समाजात आत्मविश्वासाने जगण्याची ताकद, सकारात्मक विचारांची दिशा, व्यावसायिक प्रगती आणि मैत्रीची नाती – हे सर्व या विद्यालयाची देण आहे.”

माजी शिक्षकांनीही गतस्मृतींना उजाळा देत विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. प्राचार्य भामरे म्हणाले, “तुमच्याकडून मिळालेली ही आदराची भावना आमचं आयुष्य पाच वर्षांनी वाढवणारी ठरेल.”

कार्यक्रमाची सुरुवात गणरायाच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. सूत्रसंचालन विद्या सोनवणे, प्रास्ताविक व आभार प्रदर्शन पूनम बाविस्कर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राहुल गवळे, सागर भावसार, शीतल पाटील, अतुल ठाकरे, प्रमोद भामरे आदींनी विशेष मेहनत घेतली.

मेळाव्यात अविनाश मराठे यांनी सादर केलेल्या “जिंदगी के सफर में…” आणि “चलते चलते…” या गीतांनी वातावरण भारावले. प्राचार्य भामरेंनी जुन्या आठवणींना उजाळा देत ‘लेट येणाऱ्यांना छड्या’ही दिल्या, तर सर्वांनी एकत्र “बाबा ब्लॅक शीप” ही कविता म्हणत बालपणीचा काळ पुन्हा जगला.

शिक्षक के.एस. बच्छाव यांनी शिक्षण खात्याच्या नव्या जी.आर.नुसार माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेची माहिती देत शाळेच्या गुणवत्ता विकासासाठी सहभागाचे आवाहन केले. माजी विद्यार्थ्यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद देण्याचे आश्वासन दिले.

भावनांनी ओथंबलेल्या या मेळाव्याचा शेवट “पुन्हा असेच भेटूया” या वचनाने झाला. 23 वर्षांनी एकत्र आलेल्या मित्रमैत्रिणींनी आठवणींचा खजिना पुन्हा खुला करत जड अंतःकरणाने निरोप घेतला.

-प्रतिनिधी निलेश सावळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top