साक्री तालुक्यातील भाडणे–नांदवन रोडवर मंगळवारी (दि. 19 नोव्हेंबर 2025) सायंकाळी मोटरसायकलस्वार तरुणांवर बिबट्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात मोटरसायकलवरील दोघांसह एकूण चार जण जखमी झाले आहेत.
हर्षल पंढरीनाथ शेवाळे (वय 21, रा. नांदवन) आणि ज्ञानेश्वर मोतीलाल बिचकुले (वय 21, रा. नांदवन) हे गंभीर जखमी झाले असून साक्री ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले.
तसेच हर्षल भागवत शिंदे (वय 18, रा. त्रिशूल पाडा) आणि समाधान भीमराव शिंदे (वय 22, रा. त्रिशूल पाडा) हे किरकोळ जखमी झाले आहेत.
या घटनेनंतर नांदवन व भाडणे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.
-प्रतिनिधी निलेश सावळे

