आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धुळे सायबर पोलिसांचा सक्रिय पवित्रा; सोशल मीडियावर 24×7 सायबर पेट्रोलिंग सुरू

धुळे – आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी धुळे सायबर पोलीस स्टेशनकडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्यापक सायबर पेट्रोलिंग सुरू करण्यात आले आहे. चुकीची माहिती, अफवा, द्वेषपूर्ण भाषण, धमकी, बदनामीकारक मजकूर, धार्मिक किंवा जातीय भावना भडकवणारे पोस्ट तसेच लोकशाहीला धोका पोहोचवणारे कोणतेही कंटेंट प्रसारित होऊ नयेत, यासाठी पोलिसांनी विशेष उपाययोजना राबविल्या आहेत.

जिल्ह्यातील शांततेला बाधा येऊ नये म्हणून धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सायबर पोलीस स्टेशनमध्ये स्वतंत्र सोशल मीडिया पथक स्थापन करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार पोलीस निरीक्षक अभिजीत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली २ अधिकारी व १२ अंमलदारांपासून बनलेली एकूण ४ सोशल मीडिया पथके तयार करण्यात आली आहेत.

ही पथके २४×७ ऑनलाईन मॉनिटरिंग करून सोशल मीडियावर वाद निर्माण करणारे, द्वेष पसरवणारे किंवा समाजात तणाव निर्माण करू शकणाऱ्या पोस्टचा शोध घेत आहेत. चुकीची माहिती किंवा अफवा प्रसारित करणाऱ्या अकाउंटधारकांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

कायदेशीर कारवाईसाठी खालील कलमांचा वापर करण्यात येईल:

  • BNS कलम 197: राष्ट्रीय एकात्मतेला बाधक पोस्ट
  • BNS कलम 196: समाजात तेढ निर्माण करणारी सामग्री
  • BNS कलम 298: धार्मिक भावना दुखावणारी मजकूर किंवा पोस्ट
  • BNS कलम 353(2): विविध वर्गांमध्ये वैमनस्य निर्माण करण्यासाठी खोटे विधान किंवा अफवा पसरवणे

यासंदर्भात पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सोशल मीडियावर जबाबदारीने वर्तन करावे. अफवा, द्वेषपूर्ण भाषण, धमकी, धार्मिक किंवा जातीय भावना भडकवणारे पोस्ट, व्हिडिओ किंवा मीम्स प्रसारित करू नयेत. अशा प्रकारचे कृत्य आढळल्यास संबंधितांवर तत्काळ कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top