डोंगराळेतील बालिकेवरील अत्याचार प्रकरण : आरोपीला सहा महिन्यांत फाशी द्यावी – निजामपूर-जैताणे ग्रामस्थांची एकमुखी मागणी

निजामपूर-जैताणे (ता. मालेगाव) – डोंगराळे गावात घडलेली अल्पवयीन बालिकेवरील क्रूर अत्याचार आणि हत्येची घटना माणुसकीला काळीमा फासणारी ठरली आहे. अशा नराधमांना कायद्याचा धाक राहिलेला नसल्याची भावना व्यक्त करत, दोषी आरोपीला जलदगती न्यायालयात खटला चालवून सहा महिन्यांच्या आत फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी निजामपूर-जैताणे येथील ग्रामस्थांनी केली आहे.

या निषेधार्थ निजामपूर-जैताणेत व्यापारी असोसिएशन, आझाद चौक मित्र परिवार आणि विविध सामाजिक-राजकीय संघटनांच्या वतीने पीडित बालिकेला सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य वासुदेव बदामे आणि रविंद्र जाधव यांनी संताप व वेदना व्यक्त करणारे मनोगत मांडले.

विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी ‘निर्भया पथक’ तैनात करा – ग्रामस्थांची मागणी
गावातील विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थिनी शिक्षण घेत असल्याने, त्यांच्या सुरक्षेचा विषय तातडीचा असल्याचे ग्रामस्थांनी पोलिसांकडे नमूद केले. मुलींची छेडछाड रोखण्यासाठी आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी निजामपूर-जैताणे येथे कायमस्वरूप ‘निर्भया पथक’ तैनात करण्याची मागणी करण्यात आली.
विशेषतः सोमवारी बाजाराच्या दिवशी गर्दी लक्षात घेता, त्या दिवशी निर्भया पथकाची अतिरिक्त तैनाती आवश्यक असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

मान्यवरांची उपस्थिती
सामूहिक श्रद्धांजली कार्यक्रमाला माजी सरपंच अजीतचंद्र शाह, सलीमशेठ पठाण, वासुदेव बदामे, विजय रेलन, राजेंद्र शाह, त्रिलोक दवे, नयन शाह, तसेच भालचंद्र कोठावदे, हेमंत महाले, रमेश कांबळे, सुरेंद्र विसपुते, रवींद्र देवरे, जावेद सैय्यद, तुषार सोनवणे, यांच्यासह गावातील अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आझाद चौक येथे सर्वांनी शांततेने मेणबत्त्या प्रज्वलित करून पीडितेला श्रद्धांजली वाहिली.

  • प्रतिनिधी हेमंत महाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top