६० वाहनचालकांची अल्कोहोल तपासणी; नियमभंगास कठोर कारवाईचा इशारा

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची मोहीम

धुळे (प्रतिनिधी) – शहरातील शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित राहावा यासाठी धुळे पोलिसांकडून आज (दि. २६ जून २०२५) दुपारी १२.३० ते २.३० या वेळेत व्यापक आणि अचानक तपासणी मोहीम राबविण्यात आली. शाळा सुटण्याच्या वेळी शहरातील जे. आर. सिटी स्कूल, सेंट अँथनी स्कूल, कमलाबाई हायस्कूल, कनोसा स्कूल, श्रीजी स्कूल आणि नूतन पाडवी स्कूल परिसरात ही मोहिम पार पडली.

तपासणीदरम्यान विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या प्रायव्हेट ऑटो रिक्षा आणि व्हॅन चालकांची ब्रेथ अनालायझर मशीनद्वारे अल्कोहोल तपासणी करण्यात आली. एकूण ६० वाहनचालकांची तपासणी करण्यात आली असून सर्वांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी थेट संबंधित असलेल्या बाबी लक्षात घेऊन चालकांना पुढील सूचना करण्यात आल्या :

  • वाहनांची नियमित तांत्रिक तपासणी (फिटनेस) सुनिश्चित करणे
  • सर्व कागदपत्रे वैध ठेवणे
  • शाळा परिसरात आणि मार्गावर वेगमर्यादा पाळणे
  • विद्यार्थ्यांचे सुरक्षित चढ-उतार सुनिश्चित करणे
  • मार्गदर्शित सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करणे

पोलिसांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत की, विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण करणारी कोणतीही नियमभंगाची घटना आढळल्यास संबंधित चालकांवर कठोर कारवाई करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत अशा तपासण्या पुढेही सुरू राहणार असल्याचेही पोलिसांकडून संकेत देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top