अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स आणि जिल्हा पोलीस दलाची संयुक्त धडक कारवाई
शिरपूर तालुक्यातील जामन्यापाणी परिसरात वनजमिनीवर मोठ्या प्रमाणात अवैध गांजाची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मानवी मेंदुवर विपरीत परिणाम करणाऱ्या गांजाच्या झाडांची मोठ्या प्रमाणावर लागवड सुरू असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, नाशिक कृती विभाग आणि धुळे जिल्हा पोलीस यांना मिळाल्यानंतर तात्काळ संयुक्त कारवाई करण्यात आली.
छापेमारीदरम्यान कालुसिंग गोंडा पावरा, कृष्णा तारासिंग पावरा, हरबा कुवरसिंग पावरा, गोंडा नाना पावरा यांच्यासह काही जण वनजमिनीवर सामूहिकरित्या अवैध गांजाची लागवड, देखभाल आणि रखवाली करताना आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ कारवाई करत गांजाची बाग नष्ट केली आणि मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला.
गत दोन दिवसात करण्यात आलेल्या पंचनाम्यानंतर एकूण २ हजार ५० किलो वजनाचा, अंदाजे १ कोटी ०२ लाख ५० हजार रुपये किमतीचा गांजा या कारवाईत जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास अंमली पदार्थ विरोधी पथक आणि जिल्हा पोलिसांकडून सुरू आहे.

