धुळ्यात अंधाराचा फायदा घेत प्रवाशाला लुटणारा सराईत चोरटा मुद्देमालासह जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
धुळे शहरात अंधाराचा फायदा घेत प्रवाशांना लुटणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केले आहे. काही दिवसांपूर्वी धुळ्यातील जी.टी.पी. स्टॉप येथे बसची वाट पाहणाऱ्या एका प्रवाशाचा मोबाईल आणि रोकड हिसकावून चोरट्याने पोबारा केला होता. या प्रकरणी वेगाने तपास करत पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
जितेंद्र साहेबराव पवार हे १ डिसेंबर २०२५ च्या सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास जी.टी.पी. स्टॉप येथे एसटी बसची वाट पाहत उभे होते. यावेळी अंधाराचा फायदा घेत एका अज्ञात चोरट्याने त्यांच्या हातातील मोबाईल आणि खिशातील पाकीट जबरदस्तीने हिसकावून पळ काढला होता. याप्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट दिली आणि गुप्त माहितीच्या आधारे शिंदखेडा तालुक्यातील देगाव येथील अजय उर्फ गणेश आसाराम कोळी (वय २१) याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपी अजय कोळी याच्याकडून चोरी केलेली २० हजार रुपयांची रोकड, ओप्पो कंपनीचा मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेला सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा एकूण ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, उपनिरीक्षक शाम निकम तसेच अंमलदार संतोष हिरे, चेतन बोरसे, प्रशांत चौधरी, कमलेश सूर्यवंशी, राहुल गिरी, विनायक खैरनार आणि हर्षल चौधरी यांच्या पथकाने केली आहे.
प्रतिनिधी कार्तिक सोनवणे

