पत्रकारांना अपशब्द वापरणाऱ्या उपनिरीक्षकावर कारवाईची मागणी ;

( प्रतिनिधी : निलेश सावळे)‌   साक्री  पोलीस स्टेशनचे नवीनच रुजू झालेले पोलीस उपनिरीक्षक महेश गायतड यांचा शरद चव्हाण या पत्रकाराशी वाद झाल्यानंतर त्यासंदर्भात समज गैरसमज दूर करण्यासाठी व  चर्चा करण्यासाठी दुसरे दोन पत्रकार गेले असता त्यांच्याशीही हुज्जत घालत नव्याने वाद निर्माण केला. याप्रसंगी उपस्थित असलेले दिव्यांग पत्रकार शैलेश गादेकर यांना त्यांच्या अपंगत्वावर व्यंगात्मक टीका करत पाय तोडण्याची धमकी दिली. तसेच दुसरे पत्रकार उमाकांत अहिरराव यांना शिवराळ भाषा वापरून गायतड यांनी स्वतःच्या अंगावरील शर्ट उतरवून पत्रकार अहिरराव यांना दम, दाटी केली.    

  पोलीस उपनिरीक्षक महेश गायतळ यांच्या या मुजोरपणाचा साक्री तालुक्यातील सर्व पत्रकार संघटनांनी एकत्र येत निषेध व्यक्त केला. व गायतड यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांना निवेदन देण्यात आले.       

  डीवायएसपी श्री बांबळे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पोलीस उपनिरीक्षक महेश गायतळ यांनी साक्री येथील पत्रकार तसेच पत्रकार संघाचे प्रसिद्धी प्रमुख शैलेश गादेकर यांना त्यांच्या अपंगत्वावर व्यंगात्मक टीका करत हातपाय तोडण्याची धमकी दिली आहे. सर्व प्रकार पोलीस ठाण्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याची तपासणी करण्यात यावी. समाजात पोलिसांनी या पद्धतीने वागणे चुकीचे असून पत्रकार संघ पोलीस प्रशासनातील जबाबदार कर्मचाऱ्याच्या अशा वागणुकीचा निषेध करतो. समाजाचा आरसा असणाऱ्या पत्रकारांशी उर्मटपणाने व शिवराळ भाषेत वर्तन करणाऱ्या तसेच अपंग पत्रकाराला हातपाय तोडण्याची धमकी देणाऱ्या उपनिरीक्षक यांच्यावर कार्यवाही करावी अन्यथा तालुक्यातील सर्व पत्रकार व पत्रकार संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन पुकारतील असा इशाराही  निवेदनातून देण्यात आला आहे.        दरम्यान संबंधित उपनिरीक्षकाने पत्रकारांना साक्री पोलीस स्टेशनच्या आवारातच आणि सीसीटीव्हीचे कॅमेरे सुरू असल्याची माहिती असताना शिवीगाळ केली तसेच उमाकांत अहिरराव यासोबत गेलेल्या पत्रकारावरही हल्ला केला. या घटनेने तालुक्यातील पत्रकारांमध्ये तीव्र नाराजी असून पत्रकार संघटनांनी संबंधित उपनिरीक्षकावर कारवाई करण्यासंबंधी निवेदन दिले आहे. कारवाई न झाल्यास साक्री शहरात बंद पुकारून व मोर्चा काढून निषेध केला जाईल असा इशारा उपस्थित पत्रकारांनी दिला. पत्रकारांना अशा पद्धतीने वागणूक दिल्याने नागरिक व विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांनी सुद्धा यावेळी निषेध व्यक्त केला.        उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांना निवेदन देण्यासाठी साक्री तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. नरेंद्र तोरवणे, ज्येष्ठ पत्रकार विजय भोसले, साक्री तालुका प्रेस क्लबचे संस्थापक अध्यक्ष आबा सोनवणे, प्रेस क्लबचे अध्यक्ष जगदीश शिंदे, ज्येष्ठ पत्रकार जी.टी. मोहिते, बी.एम. भामरे, जन ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश वाघ, ज्येष्ठ पत्रकार अरुण अहिरराव, लक्ष्मीकांत सोनवणे, दीपक जाधव, संगपाल मोरे,अनिल देसले बाबूद्दीन शाह, जितेंद्र जगदाळे, निलेश सावळे,अमृत सोनवणे, अंबादास बेनुस्कर, सागर काकुस्ते, उमाकांत अहिरराव, रतनलाल सोनवणे, संजय बच्छाव, खंडू पवार, योगेश हिरे, जयवंत सासके,  ज्ञानेश्वर ढालवाले, सूर्यकांत बच्छाव, सचिन सोनवणे, कल्पेश मिस्त्री, विनोद मोरे, शशिकांत अहिरराव या पत्रकार बांधवांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे धीरज देसले, साक्री तालुका प्रहार संघटनेचे अध्यक्ष जयेश बावा, उपाध्यक्ष संजय पाटील तसेच राजकीय नेते व पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top