सिल्लोडमध्ये अमानुष अत्याचार; दत्तक घेतलेल्या 4 वर्षांच्या चिमुरडीची हत्या

छत्रपती संभाजीनगर: सिल्लोड तालुक्यातील मुगलपुरा परिसरात हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. अवघ्या चार वर्षांच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

दत्तक घेतलेल्या मुलीची हालहाल करून हत्या –
प्राथमिक माहितीनुसार, हत्या झालेल्या मुलीचे नाव आयत फईम शेख असे असून, तिला फईम शेख आणि फौजिया फईम शेख या पती-पत्नीने काही महिन्यांपूर्वी दत्तक घेतले होते. मात्र, दत्तक घेतल्यानंतर या दाम्पत्याने चिमुरडीवर अनन्वित अत्याचार सुरू केले.

अत्याचाराचा अमानुष प्रकार –
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी फईम आणि फौजिया यांनी आयत हिला सहा महिन्यांपूर्वी अवघ्या पाच हजार रुपयांत विकत घेतले होते. मात्र, तिला घरी आणल्यानंतर तिच्यावर अमानुष मारहाण केली जात होती. गेल्या 15 दिवसांपासून तिला उपाशी ठेवण्यात आले होते आणि ती सतत मारहाणीचा बळी ठरत होती. इतकंच नव्हे, तर चटके देणे, हाडं तोडणे, बेदम मारहाण करणे यांसारख्या क्रूर अत्याचारांनी या चिमुरडीचा जीव घेतला गेला.

पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न; पोलिसांनी वेळीच रोखला –
बुधवारी रात्री झालेल्या या अत्याचारांमुळे आयतने प्राण सोडले. त्यानंतर फईम आणि फौजिया शेख यांनी प्रकरण लपवण्यासाठी गुपचूप अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी चिमुकलीचा मृतदेह सिल्लोड येथील कब्रस्तानात नेऊन दफन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक नागरिकांना हा संशयास्पद प्रकार लक्षात आला आणि त्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली.
सिल्लोड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दफनविधी रोखला आणि मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदनादरम्यान मुलीच्या शरीरावर अमानुष अत्याचार केल्याचे स्पष्ट झाले.

फईम आणि फौजिया शेख अटकेत –
या प्रकरणी सिल्लोड शहर पोलिसांनी फईम आणि फौजिया शेख या दोघांना अटक केली आहे.त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.या हृदयद्रावक घटनेमुळे सिल्लोड तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top