राज्यातील ५६० गोशाळांना २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन वितरण

मुंबई, दि. २८: राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात देशी गोवंश परिपोषण योजनेअंतर्गत २५ कोटी ४४ लाख रुपयांचे अनुदान ऑनलाइन पद्धतीने वितरित करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अनुदानाचे वितरण करण्यात आले.

या योजनेतर्गत जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांचे अनुदान गोशाळांना देण्यात आले आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या माध्यमातून राज्यातील ५६० गोशाळांमधील ५६ हजार ५६९ गायींसाठी पहिल्या टप्प्यात २५ कोटी ४५ लाख ६० हजार ५०० रुपये वितरित करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या कार्याचे कौतुक करताना, देशी गोवंश संवर्धन ही काळाची गरज असल्याचे सांगितले. या उपक्रमामुळे ग्रामीण विकासाला चालना मिळेल, असेही त्यांनी नमूद केले. तसेच, अधिकाधिक गोशाळांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी आयोगाचे सदस्य, अधिकारी आणि कर्मचारी प्रयत्नशील असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनीही आयोगाच्या कार्याचे स्वागत करत, देशी गोवंश संवर्धनाला चालना देण्यासाठी या योजनेचा मोठा उपयोग होईल, असे सांगितले.

गोवंश परिपोषण योजनेचे स्वरूप –
राज्यातील नोंदणीकृत गोशाळांतील देशी गायींच्या संगोपनासाठी सरकारकडून प्रतिदिन प्रति गाय ५० रुपये अनुदान देण्यात येते.

अनुदान पात्रतेच्या अटी –

  • महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे नोंदणीकृत असलेल्या गोशाळा, गोसदन, पांजरपोळ व गोरक्षण संस्थांना अनुदानासाठी पात्रता.
  • संस्थेस किमान तीन वर्षांचा गोसंगोपनाचा अनुभव असावा.
  • गोशाळेत किमान ५० गोवंश असणे अनिवार्य.
  • गोवंशीय पशुधनास ईअर टॅगिंग अनिवार्य.
  • संस्थेचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक.

योजनेमुळे शेकडो गोशाळांना दिलासा मिळत असून, आतापर्यंत ५६० गोशाळांना प्रत्यक्ष लाभ मिळाल्याचे महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top