जळगाव | जळगाव तालुक्यातील किनोद येथे २६ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. मात्र, या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. गायत्री ज्ञानेश्वर कोळी (वय २६) या महिलेचा खून करण्यात आला असल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला असून, प्रकरणात गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत.
गुरुवारी (१ मे) दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. गायत्रीने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, ती ज्या अवस्थेत आढळून आली आणि नातेवाईकांनी केलेले आरोप यामुळे संपूर्ण प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
सासू आणि नणंदवर खुनाचा संशय
गायत्रीच्या कुटुंबीयांनी स्पष्ट आरोप केला आहे की, तिच्या सासू आणि नणंद यांनी तिला मारहाण करून गळा दाबून खून केला आणि आत्महत्येचा बनाव रचला. या घटनेनंतर पती, सासू आणि नणंद हे तात्काळ फरार झाले होते.
गायत्रीच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, मासिक पाळीच्या काळात तिने स्वयंपाक केल्याने घरात वाद झाला. तिच्या सासू व नणंद यांना हा प्रकार खटकला. त्यातून किरकोळ वाद विकोपाला गेला. या वादाची माहिती गायत्रीने वडिलांनाही दिली होती, पण ते त्या वेळी गावाबाहेर होते.
गायत्री कोळी शिवणकाम करून आपल्या संसाराला हातभार लावत होती, तर तिचे पती भाजीपाला विक्री करतात. तिच्या पश्चात पती, पाच वर्षांचा मुलगा ध्रुव आणि सात वर्षांची मुलगी नियती असा परिवार आहे.
गायत्रीचा भाऊ सागर कोळी, बहीण प्रियंका आणि मावशी सुनीता यांनी मिळून स्पष्टपणे सांगितले की, तिला सासरी त्रास दिला जात होता. तिला मारहाण करण्यात आली आणि नंतर गळा आवळून तिची हत्या करण्यात आली. नंतर साडीने लटकवून आत्महत्येचा देखावा तयार करण्यात आला.
या घटनेबाबत पोलीस तपास सुरू असून, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला आहे.
