राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिले निवेदन
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते व प्रदेश चिटणीस कामराज निकम तसेच त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध दाखल करण्यात आलेली सर्व फिर्याद पूर्णपणे खोटी, बनावट आणि राजकीय हेतूने प्रेरित आहे. याचा आम्ही तीव्र निषेध करतो, प्रशासनाने वस्तुनिष्ठ तपास करून कार्यवाही करावी, तसेच खोटे गुन्हे दाखल करणे बंद करून राजकीय हेतूने होणारा प्रशासनाचा गैरवापर थांबवावा, असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यानी दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा मतदारसंघात आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, दोंडाईचा नगरपालिका आणि शिंदखेडा नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा कट रचण्यात आला आहे. कामराज निकम यांच्या लोकप्रियतेला आणि स्वच्छ प्रतिमेला डाग लावण्याचा हा डाव आहे.
शिंदखेडा तालुक्यातील एक प्रमुख आणि प्रामाणिक नेते म्हणून कामराज निकम यांनी जनसेवेच्या माध्यमातून जनतेच्या मनात स्थान मिळवले आहे. त्यांच्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करणे हे लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांवर हल्ला आहे. शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून विरोधकांचा आवाज दडपण्याचा हा प्रकार म्हणजे लोकशाहीचा अपमान आहे. यापूर्वीही शिंदखेडा मतदारसंघात अशा कारवाया घडल्या असून, यामुळे जनतेचा शासकीय यंत्रणेवरील विश्वास डळमळीत होत आहे.
श्री. कामराज निकम आणि त्यांच्या कुटुंबीयांवरील सर्व खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत, या कटात सहभागी असलेल्या दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, शासकीय यंत्रणेचा राजकीय हेतूने होणारा गैरवापर थांबवावा, अशा मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे, प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, शानभाऊ सोनवणे, दीपक अहिरे, कल्याण बागल, ईश्वर पाटील, शैलेश सोनार, राजेंद्र देशमुख, नितीन देसले, राहुल माणिक, रतिलाल पाटील, हिरालाल बोरसे, किशोर निकम, अर्जुन भिल, केतन भदाणे,विठ्ठल पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
