धुळे जिल्ह्यातील विविध क्रीडा प्रकारांमध्ये प्रशिक्षकांच्या जागा रिक्त असल्यामुळे खेळाडूंना अडचणींचा सामना करावा लागत आहे. जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंना योग्य प्रशिक्षण मिळावे यासाठी रिक्त असलेल्या प्रशिक्षकांच्या जागा तात्काळ भराव्यात, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवासेना महाराष्ट्राचे सहसचिव अॅड. पंकज गोरे यांनी केली आहे. यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांना निवेदन दिले.
धुळे जिल्ह्याने क्रीडा क्षेत्रात अनेक गुणवान खेळाडू घडवले आहेत. शालेय व महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाप्रेम मोठ्या प्रमाणात दिसून येते. मात्र प्रशिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. यामुळे त्यांची गुणवत्ता असूनही अनेकजण स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकत नाहीत.सध्या क्रिकेट, कुस्ती, बॅडमिंटन, तायक्वांदो, अॅथलेटिक्स आणि रायफल शुटिंग यांसारख्या महत्त्वाच्या क्रीडा प्रकारांमध्ये प्रशिक्षक नसल्यामुळे खेळाडूंना प्रशिक्षणासाठी खाजगी केंद्रांवर अवलंबून राहावे लागत आहे. ही खर्चिक प्रक्रिया सर्वांनाच परवडणारी नसल्यामुळे अनेक खेळाडूंच्या संधी दवडल्या जात आहेत.
धुळे क्रीडा स्टेडियममध्ये विविध खेळांचे साधनसंपन्न सुविधांचे वातावरण असतानाही प्रशिक्षक नसल्यामुळे त्याचा पुरेपूर उपयोग होत नाही. यासंदर्भात अॅड. गोरे यांनी, “जेवढ्या लवकर या रिक्त पदांवर नियुक्ती केली जाईल, तेवढ्या लवकर नवोदित खेळाडूंना संधी मिळेल. तात्पुरत्या स्वरूपात करार पद्धतीनेही प्रशिक्षकांची नेमणूक करता येईल,” असा प्रस्ताव मांडला. या प्रसंगी निलेश चौधरी, आशिष भडागे, गोकुळ येलमामे, विशाल ढेकळे, दर्शन कंबायत, भावेश अहिरराव, सौरभ जवराळ, ज्ञानेश्वर देवरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.