संत सावता माळी पुण्यतिथी निमित्त चिमुकल्यांची भव्य दिंडी

धुळे शहरातील जुने धुळे परिसरातील सुपडू आप्पा कॉलनी येथील सावता माळी प्राथमिक शाळेत संत सावता माळी यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाची सुरुवात संत सावता माळी यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. या पूजनानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझीम पथक सादर करत परिसरात ऊर्जा आणि भक्तिभावाची लहर पसरवली. विशेष म्हणजे लहानग्यांनी संतांची प्रतीकात्मक वेशभूषा परिधान करून पारंपरिक वाद्यांच्या गजरात साजरी केलेली दिंडी ही सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. दिंडीचा शुभारंभ शाळेच्या प्रांगणात पूजन करून करण्यात आला, त्यानंतर ही दिंडी संपूर्ण जुने धुळे परिसरातील विविध रस्त्यांवरून भक्तिगीतांच्या गजरात मार्गक्रमण करत पुढे सरसावली. पंचक्रोशीतून दिंडी पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

या उपक्रमात शाळेचे शिक्षकवृंद, पालक व स्थानिक नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत चिमुकल्यांचे कौतुक केले. “चिमुकल्यांमधून संस्कारांची शिदोरी देणारी ही दिंडी, संत परंपरेशी जोडणारा एक पवित्र प्रयत्न होता,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top