– ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
धुळे (प्रतिनिधी) – गेल्या अनेक वर्षांपासून शुद्ध पाण्याच्या तुटवड्याने त्रस्त असलेल्या कापडणे गावकऱ्यांनी आता आंदोलनाची दिशा बदलत लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. 15 ऑगस्टपासून हे उपोषण सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे परवानगी देण्याची औपचारिक मागणी आज ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली.
सामाजिक कार्यकर्ते भूषण ब्राम्हणे यांनी ग्रामपंचायतीला यापूर्वीच सूचना दिली होती की, 15 ऑगस्टपर्यंत गावाला शुद्ध पाणीपुरवठा न झाल्यास सर्व गावकरी आमरण उपोषणाला बसतील. गेल्या आठ-दहा वर्षांपासून कापडणेकर शुद्ध पाण्यासाठी संघर्ष करत आहेत. याआधी विविध मार्गांनी आंदोलन करूनही न्याय न मिळाल्याने अखेर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे.
ग्रामस्थांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, पाणीप्रश्न निकाली न लागल्यास 15 ऑगस्टपासून उपोषण सुरू होईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील.

