जैताणे येथील संघशक्ती सार्वजनिक व्यायामशाळेत अज्ञाताने केली तोडफोड

निजामपूर (ता. साक्री) : साक्री तालुक्यातील जैताणे गावातील ग्रामदैवत भवानी माता मंदिरासमोरील संघशक्ती सार्वजनिक व्यायामशाळेत अज्ञात व्यक्तीने मध्यरात्रीच्या सुमारास तोडफोड केली. या तोडफोडीत व्यायामशाळेत लावलेले डिजिटल बॅनर, सीसीटीव्ही कॅमेरे, एलईडी लाईट व बल्बचे मोठे नुकसान झाले आहे.
१५ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२ वाजता व १६ ऑगस्ट रोजी सकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगण्यात येते. पहाटे गावकऱ्यांना याची माहिती मिळताच ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. व्यायामशाळेचे राकेश शेवाळे यांनी तात्काळ निजामपूर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता ही तोडफोड दोन गटांमध्ये वाद निर्माण करण्याच्या उद्देशाने केल्याचा संशय व्यक्त होत आहे. नागरिकांनी या घटनेचा त्वरीत तपास करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे.
या प्रकरणी गुन्हा दाखल करून निजामपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयुर भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी माळचे व अमलदार आखाडे पुढील तपास करत आहेत.

प्रतिनिधी हेमंत महाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top