शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर, शासनाने तातडीने मदत देण्याची ग्रामस्थांची मागणी
एकीकडे राज्यभर पोळा सण उत्साहात साजरा होत असताना, शेतकऱ्याच्या जीवनातील सोबती असलेल्या बैलाचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याने धुळे तालुक्यातील वरखेडी गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी विलास संतोष धनगर हे आपल्या बैलाला पोळा सणानिमित्त वरखेडी शिवारातील ‘आर्णी’ येथे अंघोळ घालण्यासाठी घेऊन गेले होते. बैलाला स्वच्छ करत असतानाच अचानक एका विषारी सापाने त्याला दंश केला. काही क्षणातच विषाचा परिणाम वाढला आणि बैलाने तडफडून जागीच प्राण सोडले. ज्या सर्जा-राजाची पूजा करायची, सजवायचे आणि सण साजरा करायचा, त्याच दिवशी त्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याने धनगर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शेतकऱ्याच्या घरातील बैल हा फक्त जनावर नसून कुटुंबातील सदस्य आणि शेतीकामाचा मुख्य आधार मानला जातो. त्यामुळे या घटनेने धनगर कुटुंब केवळ मानसिकदृष्ट्याच नव्हे तर आर्थिकदृष्ट्याही उद्ध्वस्त झाले आहे.
या घटनेनंतर संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत असून ग्रामस्थांनी शासनाकडे तातडीने मदत देण्याची मागणी केली आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये जनावराच्या मृत्यूनंतर मिळणारी नुकसानभरपाई विलास धनगर यांना तातडीने मिळावी, अशी मागणी आता अधिक तीव्र झाली आहे.
प्रतिनिधी कार्तिक सोनवणे
धुळे
