साक्री तालुक्यातील जैताणे येथील निजामपूर–जैताणे व वासखेडी रस्त्याच्या त्रिवेणी संगमावर शासनमान्य जागेवर उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा स्मारकाच्या जागेवर अज्ञात इसमांनी बेकायदेशीर अतिक्रमण केल्याची बाब उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर जागा बांधकाम विभाग मालकीची असून 1987 ते 1989 या कालावधीत वेळोवेळी पाठपुरावा करून पुतळ्यासाठी मंजुरी मिळवण्यात आली होती. याच जागेवर 1989 साली पुतळा स्मारक उभारण्यात आले होते. त्यावेळी या स्मारकाचे उद्घाटन तत्कालीन मंत्री कै. रोहिदास पाटील, माजी खासदार रेशमा भोये व आमदार सुकाम मालसुरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. याचे पुरावे म्हणून त्या काळातील छायाचित्रे आणि जागा मंजुरीची प्रती आजही संबंधित निवेदनासोबत जोडण्यात आल्या आहेत.
मात्र, अलीकडेच रात्रीच्या अंधारात काही अज्ञात इसमांनी सदर जागेवर माती, मुरम आणि टपऱ्या ठेवून अतिक्रमण केले आहे. यामुळे स्थानिक आंबेडकरी समाजात संतापाची लाट उसळली असून, हा अतिक्रमण तात्काळ हटवावा, अशी ठाम मागणी समस्त बौद्धजन व दलित समाजाकडून करण्यात आली आहे. यावेळी मोठ्या संख्येने सामाजिक कार्यकर्ते, आंबेडकरी जनता उपस्थित होती. या संदर्भातील निवेदनाच्या प्रती जैताणे सरपंच, विभागीय अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच साक्री तहसीलदार यांना सादर करण्यात आल्या आहेत.
प्रतिनिधी हेमंत महाले
साक्री
