मुंबई, दि. 28 मार्च – राज्यातील नागरिकांच्या तक्रारी आणि सार्वजनिक समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले आहे. यानुसार, माध्यमांमधून प्रसिद्ध होणाऱ्या शासनविषयक बातम्यांची त्वरित दखल घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याद्वारे प्रशासनाची कार्यक्षमता वाढवून नागरिकांना चांगल्या सेवा देण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव आणि महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “हे परिपत्रक पारदर्शक आणि जबाबदार प्रशासनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. माध्यमांमधील बातम्यांचा त्वरित आढावा घेऊन त्या अनुषंगाने कृती केल्यास जनतेच्या समस्या प्रभावीपणे सोडवता येतील.”
प्रमुख वैशिष्ट्ये आणि उद्दिष्टे:
- माध्यमांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या तक्रारींची शासकीय विभागांकडून तात्काळ दखल
- समस्यांचे जलद निराकरण करण्यासाठी माध्यमांची मदत
- कार्यक्षम सेवा आणि सुशासनासाठी माध्यमांशी अधिक संवाद
- शासन आणि नागरिक यांच्यातील दुवा अधिक मजबूत करण्यावर भर
परिपत्रकानुसार ठरलेली कार्यपद्धती:
- प्रत्येक विभागात नोडल अधिकारी नेमले जाणार
- बातम्यांचे त्वरित परीक्षण व कृती अहवाल तयार करणे
- साप्ताहिक कृती अहवाल व मासिक पुनर्विलोकन बैठकांचे आयोजन
अपेक्षित परिणाम:
- नागरिकांच्या समस्यांचे जलद निराकरण
- प्रशासनाच्या कार्यक्षमतेत वाढ
- माध्यमांमधील शासनविषयक माहितीवर त्वरित प्रतिसाद
- जनतेच्या समाधानाचे स्तर उंचावणे
राज्यातील माध्यमांमधून सातत्याने विविध प्रश्न समोर येतात. हे परिपत्रक लागू झाल्यानंतर, त्या समस्यांकडे प्रशासन अधिक गांभीर्याने पाहणार असून, त्वरित उपाययोजना केल्या जातील. त्यामुळे महाराष्ट्रातील सुशासनाचा दर्जा उंचावण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
