धुळे जिल्ह्यात इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी आणि विधी क्षेत्रात प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या CET परीक्षेच्या तयारीसाठी उबाठा युवासेनेतर्फे राज्यभर आयोजित मोफत मॉक टेस्ट अभियानास जोरदार प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाअंतर्गत 29 मार्च 2025 रोजी धुळे येथील जयहिंद सिनियर कॉलेज आणि महाजन हायस्कूल येथे सराव परीक्षा घेण्यात आली, ज्यामध्ये 750 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
CET परीक्षेच्या स्वरूपाची योग्य तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारी कोणतीही सरकारी व्यवस्था उपलब्ध नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत गोंधळ वाटतो. उबाठा युवासेनेने राबविलेल्या या सराव परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेचा थेट अनुभव मिळाला. यामुळे परीक्षेच्या वेळी कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, कसे उत्तर द्यावे आणि तणावमुक्त पद्धतीने परीक्षेला सामोरे कसे जायचे, याबाबत विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळाले.
उबाठा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने आणि युवासेना सचिव वरणजी सरदेसाई, तसेच राज्य कार्यकारिणी सदस्य सिद्धेश शिंदे, प्रियंका जोशी आणि धुळे जिल्हा विस्तारक नदीम सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रभर हा उपक्रम राबवला जात आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा उपक्रम पूर्णपणे मोफत ठेवण्यात आला असल्याने सर्वसामान्य आणि गरीब विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा झाला आहे. धुळे शहरात अशा प्रकारच्या परीक्षेसाठी अचूक मार्गदर्शन करणारी कोणतीही व्यवस्था उपलब्ध नसताना देखील अल्प कालावधीत मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून जिल्हा युवासेनेने आनंद व्यक्त केला आहे. संपूर्ण जिल्ह्यात या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, जयहिंद शैक्षणिक संस्थेचे संचालक मोहन मोरे, धुळे शहर विधानसभा संघटक ललित माळी, युवासेना कार्यकारिणी सदस्य प्रियंका जोशी, युवासेना जिल्हाप्रमुख हरीश माळी, युवासेना विस्तारक सोनी सोनार, युवासेना जिल्हा समन्वयक मोहित वाघ, युवासेना शहर संघटक जयेश फुलपगारे, युवासेना महानगर प्रसिद्धीप्रमुख शुभम फुलपगारे, रोहित ढोले आणि युवा सैनिक उपस्थित होते.
कार्तिक सोनवणे
धुळे .
