धुळे जिल्ह्यातील अनेक वर्षांपासून निधीअभावी रखडलेल्या पिण्याच्या पाण्याच्या आणि सिंचन प्रकल्पांना लवकरच नवसंजीवनी मिळणार आहे. खासदार डॉ. शोभा बच्छाव यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, केंद्रीय जलशक्ती मंत्री नाम. सी. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत तापी जलवाहिनी, अक्कलपाडा योजना (भाग २) आणि प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजना यांना भरघोस निधीची मंजुरी देण्यात आली आहे.
या तीनही योजनांसाठी अनुक्रमे ₹२२५ कोटी (तापी जलवाहिनी), ₹९६५ कोटी (अक्कलपाडा योजना) आणि ₹९७३ कोटी (प्रकाशा-बुराई योजना) इतक्या निधीची गरज होती, ज्यासाठी डॉ. बच्छाव यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जोरदार पाठपुरावा केला होता. प्रस्तावित निधीची मागणी करताना डॉ. शोभा बच्छाव यांनी धुळे पाटबंधारे विभाग, सिंचन भवन, जल जीवन मिशन आणि महानगरपालिका यांच्याशी समन्वय साधून संबंधित प्रकल्पांचे सविस्तर प्रस्ताव वेळेत सादर केले. त्यानंतर दिल्ली येथे झालेल्या जलशक्ती मंत्रालयाच्या आढावा बैठकीत त्यांनी धुळे लोकसभा मतदारसंघातील पाणी आणि सिंचनाच्या प्रश्नांचे प्रभावी सादरीकरण केले.
त्यांच्या या प्रयत्नांमुळे २२ मे २०२५ रोजी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या बैठकीत तीनही प्रकल्पांना मंजुरी मिळाली, ज्यामुळे धुळे जिल्ह्यातील हजारो नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तापी जलवाहिनी ही धुळे शहराला पाणीपुरवठा करणारी जुनी व्यवस्था असून, तिच्या पाईपलाईनमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होते. त्यामुळे ४० कि.मी. लांबीची नवीन जलवाहिनी आवश्यक आहे.
अक्कलपाडा योजना (भाग २) सध्या केवळ ६५% धरण भरते, कारण २०० हेक्टर जमिनीचे अधिग्रहण अद्याप बाकी आहे. हे पूर्ण झाले, तर धरण १००% भरू शकते. प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजना ही शिंदखेडा व नंदुरबार तालुक्यातील २८ अवर्षणप्रवण गावांना सिंचन व पिण्याच्या पाण्याची सोय करून देणार असून, ७,०८५ हेक्टर जमिन ओलीताखाली येणार आहे.
खासदार डॉ. बच्छाव यांनी ही माहिती प्रसारमाध्यमांना देताना सांगितले की, “या योजनांची अंमलबजावणी १००% होईल आणि धुळे जिल्हा जलसमृद्ध बनेल.” या घोषणेमुळे धुळे शहरासह शिंदखेडा, नंदुरबार आणि परिसरातील नागरिकांमध्ये आशेचा नवा किरण निर्माण झाला आहे.