साक्री : महाविद्यालयीन युवतींना आधुनिक जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्यास सक्षम बनवण्यासाठी “आत्मनिर्भर युवती अभियान” कार्यशाळा साक्री येथे संपन्न झाली. कार्यक्रमाचे उद्घाटन विद्या विकास मंडळाचे सिताराम गोविंद पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय साक्री येथे करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री विकास शेवाळे यांनी विद्यार्थिनींना आत्मनिर्भर होण्याचे महत्त्व सांगितले आणि महिलांच्या संरक्षणासाठी पोलीस प्रशासन तत्पर असूनही विद्यार्थिनींनी जागरूक राहणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. राजेंद्र अहिरे यांनी कार्यशाळेचे महत्त्व अधोरेखित करत, विद्यार्थिनींनी प्राप्त ज्ञानाचा दैनंदिन जीवनात उपयोग करावा असे सुचवले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पंकज अहिरे यांनी केले. कार्यशाळा १७ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर २०२५ या कालावधीत पार पडली. या दरम्यान विविध विषयांवर व्याख्याने झाली, ज्यामध्ये समावेश होता:
महिला आरोग्य विषयक समस्या व जनजागृती – डॉ. विजय गौंड
महिला उद्योजकता विकास – श्री नितीन जगदाळे
बँक कार्यपद्धती समजून घेणे – श्री चैतन्य गांगुर्डे
काव्य गीतांमधून महिला सक्षमीकरण संदेश – श्री सतीश पेंढारकर
समारोप कार्यक्रम डॉ. विवेकानंद चव्हाण यांच्या हस्ते पार पडला. उद्घाटन समारंभाचे संचलन डॉ. ज्योती वाकोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. योगेश आहेर यांनी केले.
कार्यशाळेत महाविद्यालयातील ५० विद्यार्थिनींनी सहभाग घेतला, तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या “कमवा व शिका” योजनेतील विद्यार्थ्यांनी मोठा परिश्रम घेतला.
-प्रतिनिधी निलेश सावळे

