धुळ्यात गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसांसह इसम जेरबंद

धुळे शहरातील रेल्वे स्टेशन रोड परिसरात गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुस बाळगणाऱ्या इसमाला पोलिसांनी अटक केली आहे. धुळे शहर डिटेक्शन ब्रँच (डी. बी. पथक)च्या या कारवाईमुळे शहरात अवैध शस्त्रसाठ्याचा पर्दाफाश झाला आहे.
धुळे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, रेल्वे स्टेशन रोडवरील रेल्वे बोगद्याजवळ एक इसम गावठी पिस्तूल घेऊन फिरत असून तो दहशत माजवण्याच्या प्रयत्नात आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक प्रशांत राठोड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तत्काळ शोध मोहीम हाती घेतली.
शोध मोहिमेवेळी पोलिसांना एक इसम संशयास्पद हालचाली करताना आढळून आला. पोलिसांनी त्याला थांबवून विचारपूस केली असता, तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. अधिक तपास करताना त्याची झडती घेण्यात आली, ज्यात त्याच्या कमरेला लपवलेले गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे सापडली.
ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव साहिल सुनिल केदार (वय २१, रा. नारायण मास्तर चाळ, चितोड रोड, धुळे) असे आहे. पोलिसांनी त्याच्याकडून खालील शस्त्रे जप्त केली –
-गावठी बनावटीचे पिस्तूल (कट्टा) – किंमत सुमारे ₹२५,०००
-दोन जिवंत काडतुसे – प्रत्येकी किंमत ₹१,०००, एकूण किंमत ₹२,०००

या प्रकरणी भारतीय हत्यार अधिनियम १९५९ चे कलम ३/२५ अंतर्गत गुन्हा क्रमांक ८७/२०२५ नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश पवार करत आहेत.
धुळे पोलिसांनी जलद आणि प्रभावी कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतल्याने शहरातील सुरक्षाव्यवस्था अधिक मजबूत झाली आहे. ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे आणि पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस उपनिरीक्षक प्रशांत राठोड, पोहेकॉ जावेद शेख, पोहेकॉ रविकिरण राठोड, कुंदन पटाईत, महेश मोरे, तुषार पारधी, अमित रनमळे, अमोल पगारे, प्रशांत नाथजोगी, अमोल कापसे, धम्मपाल वाघ, योगेश ठोकुर, राकेश मोरे, हनिफखॉ पठाण आणि संजय रनदिवे यांनी केली.

– प्रतिनिधी कार्तिक सोनावणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top